#Social
होळ ग्रामपंचायतसमोरील पाच सदस्यांचे ठिय्या आंदोलन मागे…..!
ग्रामविकास अधिकाऱ्याच्या नियुक्तीसह आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला
डी डी बनसोडे
June 8, 2021
केज दि.८ – तालुक्यातील होळ येथील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या नियुक्तीसह आरोग्य उपकेंद्रातील प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला. याबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे यांच्यासह इतर सदस्यांनी मंगळवारी (दि.८) ठिय्या आंदोलन मागे घेतले.
होळ येथील ग्रामसेवक श्रीकांत कांबळे यांच्या जागी मंजूर पदानुसार ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे रखडलेले काम सुरू करावे. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्यभामा राख, आश्रूबाई राख, शेषेकला शिंदे, लताबाई घुगे या सदस्यांसह भाऊसाहेब राख, तुकाराम घुगे, ज्ञानोबा शिंदे आदींनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव पंडित शिंदे यांनी पाठिंबा दिला. आंदोलनाची सुरुवात ११ वाजता झाली होती. त्यानंतर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली.
यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्याचे रिक्त पद चार दिवसात भरू असे लेखी आश्वासन प्रभारी गटविकास अधिकारी आर.एस. कांबळे यांनी दिले. तसेच, १५ दिवसात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे मूल्यांकन करून निधी मागणीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच, बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता श्री. सय्यद यांनी दिले. तर आंदोलनापूर्वीच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी यांची प्रतिनियुक्ती रद्द करून पुन्हा नेमणूक करण्याचे आदेश दिले. तसेच रिक्त पदे भरून आरोग्य सेवा सुरळीत करण्याचा शब्द तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिला. सर्व प्रश्न मार्गी लावून सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, विस्तार अधिकारी बाबुराव राऊत, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.सय्यद यांच्या उपस्थितीत पत्र देऊन ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, युसूफवडगाव पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तर कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करून ठिय्या आंदोलन पार पडले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होते.सभापती, उपसभापतींसह मध्यस्थीने आंदोलन मागे
दरम्यान ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन सभापती पती विष्णू घुले, उपसभापती ऋषिकेश आडसकर यांच्या मध्यस्थीने व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता गिरी, तहसीलदार लक्ष्मण धस यांच्या सूचनेवरून प्रश्न मार्गी लागले. त्याबद्दल पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.