पर्यावरण
केज शहरात नगरपंचायत च्या वतीने घनवन वृक्षलागवड…..!
केज दि.९ – शहरातील विठाई पुरम भागातील मोकळ्या जागेत पर्यावरण दिनी घनवन वृक्षलागवड अंतर्गत विविध वृक्षांची लागवड करून प्रकल्पाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत चे प्रशासकीय अधिकारी अन्वर सय्यद यांनी दिली.
दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या वृक्षांची संख्या चिंतेची बाब आहे. मात्र या बाबीचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे विविध उपक्रम राबवल्या जात आहेत. तसेच कोरोनाच्या काळात ऑक्सिजन चे महत्व संपूर्ण जगाला ज्ञात झाले असून वृक्ष लागवडीवर भर देण्यात येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभाग केजच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नगर पंचायत च्या वतीने विठाई पुरम भागात असणाऱ्या नगरपंचायत च्या 20 गुंठे क्षेत्रात पर्यावरण दिनी घनवन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
यामध्ये आतापर्यंत विविध प्रकारच्या सुमारे 800 वृक्षांची लागवड करण्यात आली असून यापुढेही या प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे अन्वर सय्यद यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी श्री.सावंत, नगर अभियंता जी.के.सिरसाट, एस.एन. हाजबे, सामाजिक वनीकरण चे तागड पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.