लहान मुलांच्या बाबतीत दिलासादायक माहिती……!
नागपूर दि.10 – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट ओसरले असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असले तरी आता पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यविषयक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये एक दिलासायक बाब समोर आली आहे. नागपूरमध्ये कोरोना लसीच्या चाचणीसाठी निवड झालेल्या शहरातील 18 टक्के मुलांमध्ये कोरोना विषाणूविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना लसीच्या चाचण्यांसाठी 12 ते 18 वयोगटातील मुलांची निवड करताना ही बाब निदर्शनास आलीय.
नागपूरमध्ये लहान मुलांना कोरोना लस देण्यासाठी चाचणी सुरु आहे. त्यासाठी वय वर्षे 12 ते 18 वयोगटातील मुलांची निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यावर चाचणी करताना 50 पैकी 10 मुलांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण 18 टक्के आहे. ही बाब समोर आल्यामुळे आरोग्य तज्ज्ञांकडून समाधान व्यक्त केले जात असून हे सगळं दिलासादयक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कोरोना लसीच्या चाचण्यांसाठी 12 ते 18 वयोगटातील मुलांची निवड करण्यात आली. यावेळी त्यातील काही मुलांच्या शरीरात अँटिबॉडिज तयार झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून शहरातील अन्य मुलांचीही स्थिती वेगळी नाही, असं वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांचं मत आहे. दुसऱ्या लाटेत या मुलांना कळत न कळत कोरोनाचा संसर्ग होऊन गेला. त्यामुळे शहरातील अन्य मुलांमध्येही अँटिबॉडीज तयार झाल्या असण्याची दाट शक्यता आहे. 50 पैकी 10 मुलांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. हा आकडा कमी असला तरी हा एक चांगला संकेत आहे, असे वैद्यकीय वर्तुळात बोलले जातेय.
दरम्यान, बालरोगतज्ञ डॅा. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या मेडीट्रीना हॅास्पीटलमध्ये लहान मुलांच्या कोरोना लसीची चाचणी सुरु आहे. ही चाचणी प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेशी दोन हात करणे सोपे होणार आहे. लहान मुलांचे लसीकरण झाले तर तिसऱ्या लाटेत त्यांना असलेला धोका टाळता येऊ शकेल, असेही म्हटले जात आहे.