आरोग्य व शिक्षण

शैक्षणिक सत्र सुरू होताच विद्यार्थ्यांना करावी लागणार पूर्व इयत्तेची उजळणी……!

मुंबई दि.10 – यावर्षी शैक्षणिक सत्र सुरू होताच  विद्यार्थ्यांना एक नवीन ब्रिज कोर्स शिकावा लागणार आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग हा ब्रिज कोर्स तयार करत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
                      शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून राज्यातील शाळा बंद आहेत. दीड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. त्यात कोरोनासारखा साथीचा जीवघेणा आजार त्यांनी पाहिला किंवा अनुभवला आहे. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला हा ब्रिज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे.
या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम ठरवणार असल्याचं SCERT ने स्पष्ट केलं.

नेमका काय आहे ब्रिज कोर्स ?

15 जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे. SCERT चे संचालक दिनकर टेमकर यांनी बोलताना सांगितलं, “या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी समजा पाचवीत आहे. तेव्हा हा ब्रिज कोर्स चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही असे महत्त्वाचे विषय आम्ही ब्रिज कोर्समध्ये घेत आहोत.”
1 प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी ब्रिज कोर्स उपलब्ध असेल. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं.
2 हा ब्रिज कोर्स 45 दिवसांचा असणार आहे.
3 यंदा विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
4 पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.
5 ब्रिज कोर्स शिकवल्यानंतरच विद्यार्थ्यांना चालू इयत्तेतील अभ्यासक्रम शिकवता येणार आहे.
6 ब्रिज कोर्सकडे केवळ एक कोर्स पूर्ण करण्याच्यादृष्टीने पाहण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रात्यक्षिक, त्यांचे अनुभव याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा असल्याचे एससीईआरटी मराठी विभाग प्रमुख आवटे यांनी  सांगितलं.
7 सुरुवातीला शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा स्तर काय आहे याची चाचपणी करण्याच्या सूचना आहेत. ब्रिज कोर्स शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाही हे सुद्धा शिक्षकांना पहावे लागणार आहे.
8 हा ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहेत.
9 मराठी, गणित, सामाजिकशास्त्र अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्रिज कोर्स असणार आहे. SCERT यासंदर्भातील नियोजन करत असून प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळांकडून ब्रिज कोर्स अंतिम केला जाणार असल्याचे समजते.
                    राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) मराठी भाषा विभागाच्या प्रमुख आवटे यांनी बोलताना सांगितलं, “मुलांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स तयार केला जात आहे. शाळा बंद असल्याने दुसरीत गेलेला विद्यार्थी प्रत्यक्षात पहिलीत शाळेत न जाता दुसरीत गेला आहे. तेव्हा प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे असं आम्ही गृहीत धरत आहोत आणि त्यादृष्टीने ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करत आहोत.”
“पुढील इयत्तेत शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी पूर्वज्ञानावर अवलंबून असतात. त्या मुलांना आल्या पाहिजेत हा आमचा हेतू आहे.” असं संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितलं.

का आहे ब्रिज कोर्सची आवश्यकता ?

गेल्या वर्षीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्षित शिक्षण पोहचलेलं नाही. अनेक विद्यर्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाचीही सोय नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अपेक्षित आकलन झालेले नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांचे जवळपास दोन वर्षांचे शैक्षणिक नुकसान झाले असून शाळा सुरू झाल्यानंतर ही पोकळी भरून काढल्याशिवाय पुढील इयत्तेचा अभ्यास शाळांनी सुरू करू नये अशीही काही शिक्षकांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर हा ब्रिज कोर्स तयार करण्यात येत असल्याचे समजते.
                       ब्रिज कोर्स संदर्भातील एका बैठकीत सहभागी झालेले शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचलेलं नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास, तिसरीत विद्यार्थ्यांची गुणाकाराची संकल्पना स्पष्ट झाली नाही तर चौथीत भागाकार करण्यात त्यांना अडचणी येणार. एकूणच विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहणार. हे केवळ एका विषयाच्या बाबतीत नाही तर प्रत्येक विषयाची ही परिस्थिती असू शकते.”
“शाळा सुरू झाल्यानंतर थेट अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान झालेली पोकळी भरून काढणं गरजेचं आहे. यासाठी ब्रिज कोर्स महत्त्वाचा आहे. केवळ पुस्तकी अभ्यासक्रम नव्हे तर विद्यार्थ्यांचे समुपदेशन त्यांचे मानसिक आरोग्य याचाही विचार व्हायला हवा.” असंही त्यांनी सुचवलं.

‘लर्निंग लॉस’ म्हणजे नेमके काय?

राज्यातील अनेक शिक्षक ब्रिज कोर्ससाठी पूर्व तयारी करत असून यासंदर्भात शिक्षकांमध्येही मतेमतांतरे आहेत. ब्रिज कोर्समध्ये केवळ पुस्तकी अभ्यासक्रमावर भर देण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, त्यांचे समुपदेशन अशा गोष्टींचीही दखल घेण्यात यावी असं मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केलं आहे.लॉकडॉऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतीदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसल्याचे दिसून आले.लॉकडॉऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या क्वेस्ट एज्यूकेशन संस्थेचे प्रमुख निलेश निमकर सांगतात, “दोन प्रकारचा लर्निंग लॉस असतो. पहिला म्हणजे यापूर्वी जे मुलांना येत होतं त्यातूनही मुलं थोडी मागे गेल्याचे दिसते. दुसरं म्हणजे यावर्षी जे शिकले असते तेवढे शिक्षणही त्यांच्यापर्यंत पोहचले नाही.”डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात क्वेस्टा संस्थेने शंभरहून अधिक मुलांचे यासंदर्भात सर्वेक्षण केले. त्यानुसार, लॉकडॉऊनपूर्वी वाचून समजायचे अशी मुलंही आता यात मागे गेल्याचे दिसते.
           दरम्यान “लॉकडॉऊन सुरू झालं तेव्हा मुलांना काहीतरी येत होतं. पण त्यातही मुलं मागे पडल्याचे दिसते. वर्षभर शिकली असती पण विद्यार्थ्यांना ती संधीही मिळाली नाही. ब्रिज कोर्सचा अर्थ हा मुलं कुठे आहेत तिथून शिकवायला सुरुवात झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची लेखी अभिव्यक्ती आणि बेसिक गणित याची चाचपणी करून तिथपासून शिकवायला सुरुवात केली पाहिजे.” अशी विस्तारित संकल्पना ब्रिज कोर्स मध्ये मांडण्यात आलेली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close