ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडे आक्रमक……!
मुंबई दि.11 – मराठा आरक्षणासह आता ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण या तीन मुद्यांवरून ठाकरे सरकार चांगलच घेरलं गेलं आहे. मराठा आरक्षणावरून वातारण पेटलेलं असताना ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागासवर्गास न मिळणारे आरक्षण अन्याय करणारे असून या विषयावर शांत राहणार नाही. राज्य सरकारला ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे असं वाटतच नाही, त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नाही, असा आरोप भाजपच्या सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी केला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकार कमी पडलंच आहे. आता आरक्षण विषयात दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनगणनेकडे आरक्षणाचा विषय वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी याआधी मांडली होती.
दरम्यान, मंत्रिमंडळाने ‘इम्पेरिकल डाटा’ तयार करण्यासाठी समिती स्थापन करावी आणि ओबीसी आरक्षणाचे हित जपावे, अशा सुचना त्यांनी ठाकरे सरकारला दिल्या आहेत. ज्यांना आरक्षण आहे त्यांना देखील आरक्षण देण्यास सरकार कमी पडत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.