लातूर दि.१३ -शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काल (शनिवार) रात्री दहा ते बारा जणांनी धुडगूस घालत डॉक्टरांना मारहाण केली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमचा रुग्ण दगावला, असा आरोप करीत डॉक्टरांना टोळक्याने मारहाण केली याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर लातूरच्या गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड सदृश्य आजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर दहा ते बारा नातेवाईक रात्री दहा नंतर हॉस्पिटलमध्ये जमा झाले आणि त्यांनी डॉक्टरांशी वाद घालायला सुरुवात केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमचा रुग्ण दगावला असा आरोप करीत डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. वेळीच हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करीत मारहाण करणाऱ्या लोकांना बाहेर काढले.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. रुग्ण मृत झाल्याचे कारण सांगून या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवला होता. मारहाण करणाऱ्यांवर लातूरच्या गांधी चौक पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.