#Unlockआपला जिल्हा
सायंकाळी पाच नंतर संचारबंदी आहे याचे भान ठेवावे……!

बीड दि.१५ – जिल्हा तिसऱ्या लेव्हल मध्ये येत असल्याने कांही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे.मात्र याचा गैरफायदा घेतल्या जात असल्याने कमी होत असलेली रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्याची वर्गवारी चौथ्या लेव्हल मध्ये होण्याची भीती निर्माण झाली असून असेच गैरवर्तन होत गेले तर जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा कडक निर्बंधाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.
सद्यस्थितीत जिल्हामध्ये कोवीड19 च्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल-3 चे निर्बंध लागु आहेत सदरील निर्बंधामध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरु असल्याने जिल्हयातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसुन येत आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन दैनंदिन प्राप्त होणाऱ्या दैनिक अहवालावरुन असे निर्दशनास येते की, जिल्हयामध्ये दि. 10.06.2021 रोजी 168 रुग्ण, दि. 11.06.2021 रोजी 130 रुग्ण, दि. 12.06.2021 रोजी 180 रुग्ण, दिनांक 13.6.2021 रोजी 108 रुग्ण व दि. 15.06.2021 रोजी 154 रुग्ण कोवीड रुग्ण आढळुन आलेले आहेत.
जिल्ह्यात निर्बंधामध्ये शिथीलता असल्या कारणाने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक कोवीड योग्य वर्तन’ ( Covid Appropriate Behaviour) चे पालन करत नसुन बाजारपेठांमध्ये विनाकारण फिरत असल्याने, शासकीय कार्यालयामध्ये समुहांमध्ये गर्दी करत असल्याने, आवश्यकता नसताना रस्त्यांवर समुहांमध्ये उभे राहणे, मास्क चा वापर न करता बाहेर फिरणे इ. कारणांमुळे रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे.तसेच बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतर (Social Distancing), सॅनिटायझर चा वापर व मास्कचा वापर कमी प्रमाणात करत असुन यामुळे भविष्यात पुनःश्च कडक निर्बंधाची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब जिल्हयातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, शहरांमधील बाजारपेठांमध्ये आवश्यकता असेल तर बाहेर पडावे, सर्व आस्थापनाधारकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर (Social Distancing), सॅनिटायझर चा वापर व मास्कचा वापर आवश्यक करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे, सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण समुहांमधील वावर टाळावा. रेस्टॉरंट, हॉटेल या केवळ 50 टक्के उपस्थितीमध्येच निर्देशित केलेलया वेळेत चालु ठेवण्यात याव्यात. अन्यथा संबंधित रेस्टॉरंट, हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान यापुढे रुग्ण संख्यावाढीचा आलेख वाढत राहिल्यास, नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल तसेच कोवीड-19 विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर शासन नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सर्व व्यापारी वर्गांनी निर्देशित केलेल्या वेळेत दुकाने उघडावी तसेच संध्याकाळी 05.00 नंतर अत्यंत आवश्यकता असेल तरच (वैद्यकीय कारणास्तव) घराबाहेर पडावे. संध्याकाळी 05.00 नंतर संचारबंदी लागु आहे याचे देखील सर्व नागरिकांनी भान ठेवावे. रुग्ण संख्या, रुग्ण वाढीचा दर (Positivity Rate) वाढल्यास शासन निर्देशांनुसार जिल्हा जर स्तर 3 ( level-3) मधुन स्तर 4 (level-4) मध्ये गेल्यास सर्व नागरिकांना पुन्हा कडक निर्बंधाना सामोरे जावे लागेल याची नोंद सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.