दहावी निकाला संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वपूर्ण घोषणा…..!
मुंबई दि.१७ – महाराष्ट्र शासनाने दहावीच्या निकलासंदर्भात आज मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय रेखा कला परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी नुकतंच ट्विट करून यासंबंधीत माहिती दिली आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत (एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळांच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुणांसाठी पात्र आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासोबत वर्षा गायकवाड यांनी एक जीआर देखील शेअर केला आहे.ही सवलत फक्त यावर्षीसाठी आहे. एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परिक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परिक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन 2020-2021 मध्ये इ.10वी परीक्षेत गुणांची सवलत देण्यात येईल, असं महाराष्ट्र शासनाने जीआरमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 15 जून रोजी सर्व शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, त्या शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याविषयी काहीच सांगण्यात आलं नव्हतं. काल वर्षा गायकवाड यांनी यासंबंधित माहिती दिली आहे. सध्या शाळा न सुरू करता फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.