बीड जिल्हा आणखीही तिसऱ्या लेवलमध्येच, निर्बंध कायम…..!
बीड दि.18 – मागील आठवडाभरात बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर कमी होण्याऐवजी वाढल्याने बीड जिल्ह्यात आणखी एक आठवडा तरी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाही. या आठवड्यात बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ७. ११ % इतका नोंदवल्या गेल्याने जिल्हा अजूनही तिसऱ्या लेव्हलमध्येच आहे. त्यामुळे सायंकाळ नंतरची संचारबंदी आणि इतर निर्बंध कायम राहणार आहेत.
राज्यात सरकारने अनलॉकसाठी पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनबेडचा वापर यावर आधारित ५ लेव्हल ठरवल्या आहेत. बीड जिल्ह्याचा या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर ७. ११ % इतका आला आहे. मागील आठवड्यात तो ५.२२ % इतका होता. पॉझिटिव्हिटी दर % % पेक्षा अधिक असल्याने बीड जिल्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. आणखी एक आठवडा तरी आता हीच लेव्हल कायम राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंधांची परिस्थिती आणखी एक आठवडा तरी जैसे थे असणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत
दरम्यान जिल्ह्याला संपूर्णतः मोकळा श्वास घ्यायचा असेल तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी करून जिल्ह्याला पहिल्या किंवा दुसऱ्या लेव्हलमध्ये यावे लागणार आहे. पॉझिटिव्हिटी दर ५ % पेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेडचा वापर १० % पेक्षा कमी झाला तर जिल्हा पहिल्या लेव्हलमध्ये येऊ शकतो. सध्या ऑक्सिजनबेडचा वापर ११ % आहे. रुग्णसंख्या कमी झाली की हा टक्का देखील कमी होणार आहे. मात्र पॉझिटिव्हिटी दर ५ % पेक्षा कमी आणणे हेच आता आव्हान असणार आहे.