
केज दि.१ – शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढत असलेल्या महिलेचे १ तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. ३१) दुपारी घडली. प्रवाशांसह बस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी महिला – पुरुष प्रवाशांची झडती घेतली, मात्र दागिने लंपास करणारे चोरटे बसस्थानाकातून पसार झाले. त्यामुळे दर आठ पंधरा दिवसांना सामान्य प्रवाशांना पोलिसांच्या झाडाझडतीला नाहक सामोरे जावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आसोला (ता. धारूर) येथील आशाबाई शामराव बोबडे या गुढी पाडव्याच्या दिवशी साळेगाव (ता. केज) येथे बारशाच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. सोमवारी दुपारी साळेगावहून केजच्या बसस्थानकात आल्या. दुपारी १.३० वाजेच्या पंढरपूरहून परतुरकडे निघालेल्या बसमध्ये धारूरला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या पिशवीची चैन उघडून १ तोळ्याचे गंठण व बोरमाळ काढून घेत चोरट्याने पोबारा केला. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने चालक – वाहक हे प्रवाशांसह बस घेऊन ठाण्यात आले. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला प्रवाशांना वाहतूक शाखेच्या रूममध्ये नेऊन झडती घेतली. तर पुरुष प्रवाशांची पोलिसांनी झडती घेतली. मात्र चोरी गेलेले दागिने मिळून आले नाहीत. शेवटी महिला तक्रार देण्यासाठी ठाण्यात थांबली, प्रवाशी घेऊन बस पुढे मार्गस्थ झाली.
दरम्यान, शहरातील बसस्थानकात दागिने, पैसे चोरीच्या घटना अधून मधून घडत आहेत. मात्र चोरीला गेलेल्या दागिने, पैसे लांबविणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांना तपास लागत नसून चोरटे डल्ला मारत आहेत. चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे महत्वाचे आहे.
पोलीस मदत केंद्र नावाला
बसस्थानकात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्रात कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नसल्याने या पोलीस मदत केंद्राला कुलुप असून नावाला उरले आहे. चोरीच्या घटना घडत असताना पोलीस कर्मचारी नियुक्त केले जात नसल्याने या चोरीच्या घटनांचे पोलिसांना गांभीर्य राहिले नाही. परिणामी, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, केज शहर हे दोन राष्ट्रीय महामार्गावर येत असून येथून लांबपल्याच्या बस धावत आहेत. या बसकडे चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले असून दूर प्रवासासाठी निघालेल्या महिलांचे दागिने लंपास केले जात आहेत. पोलीस कर्मचारी नसल्याने चोरटे डल्ला मारीत आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांनी बसमध्ये चढत असताना व प्रवास करीत खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण सदरील टोळी पोलिसांच्या नाकावर टिच्चून दागिने लंपास करत आहे.