शिक्षणमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद…..!
मुंबई दि.२३ – जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कित्येकांना या महामारीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक मुलं कोरोनामुळे अनाथ झाली आहेत. अशा अनाथ झालेल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिलेला असताना आता महाराष्ट्र शासन या मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. या प्रस्तावाला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड ट्वीट करत म्हणाल्या की, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा 1 ली ते 12वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच आवश्यक निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
दरम्यान, वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कसोटीने प्रयत्न करीत आहे. काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता तपासण्याची परवानगी दिल्याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांचे आभार.