#Accident
केज बस स्थानकात वृद्धेचा मृत्यू…..!
केज दि.२३ – येथे वृद्धापकाळ योजने अंतर्गत मिळणारे अनुदान उचलण्यासाठी आलेली वृद्ध महिला चक्कर येऊन पडल्याने केज येथील बस स्टँडच्या परिसरात गतप्राण झाली.
दि. २३ जून रोजी सकाळी ११.३० वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील लाखा येथील भामाबाई सोजर खंडाळे वय ८५ वर्ष या त्यांची मुलगी चंद्रकला चंदनशिव यांच्या सोबत केज येथे वृद्धापकाळ योजने अंतर्गत मिळणारे अनुदान उचलण्यासाठी आल्या होत्या. अनुदान उचलून त्या मायलेकी परत लाखा येथे गावी जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर आल्या असता दगदगीमुळे भामाबाई खंडाळे यांना चक्कर आली. त्यातच त्या खाली पडल्या आणि जागीच गतप्राण झाल्या.
सदर घटना घडताच त्या मयत महिलेच्या मुलीने हंबरडा फोडला. त्यावेळी बस स्टँड परिसरात उपस्थित असलेले पत्रकार श्रीराम तांदळे, शेख माजेद, जय जोगदंड, माजी नगरसेवक कपिल मस्के, शेखर सिरसट यांनी पोलीस आणि पत्रकार गौतम बचुटे यांना माहिती दिली. त्या नंतर रुक्मिणी पाचपिंडे, मंगेश भोले व गौतम बचुटे यांनी महिलेचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधला व प्रेत गावाकडे घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था करून प्रेत गावाकडे पाठवले.