कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना लसीचा दुसरा डोस घेण्याची गरजच नसल्याचं ICMR चे नवे संशोधन समोर…….!
नवी दिल्ली दि.२५ – संशोधनातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना लसीचा दुसरा डोस घेण्याची गरजच नसल्याचं ICMR च्या नव्या संशोधनातून समोर आलं आहे. 121 नागरिकांच्या अँटिबॉडिज टेस्टचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला.कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडिज तयार झालेल्या असतात. पहिल्या डोसनंतर या अँटिबॉडिजमध्ये वाढ होऊन मुबलक प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, असं या संशोधकांनी जाहीर केलं आहे.
कोरोना झालेले आणि न झालेले असे दोन्ही प्रकारचे नागरिक यात होते. लस घेण्यापूर्वी, पहिला डोस घेतल्यानंतर 25 ते 35 दिवसांनी आणि मग दुसऱ्या डोसनंतर 25 ते 35 दिवसांनी त्यांची अँटिबॉडी टेस्ट करण्यात आली ज्यांना पहिला डोस घेण्याअगोदर कोरोनाची लागण होऊन गेली होती, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता पहिल्या डोसनंतरच वाढत असल्याचं लक्षात आलं. शिवाय कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमधील अँटिबॉडिजच्या संख्येत दुसऱ्या डोसनंतर विशेष फरक पडत नसल्याचंही दिसून आलं, असं तज्ज्ञांनी सांगितलं.
दरम्यान आपण कोरोना नियमांचं नीट पालन केलं आणि कोरोना लस घेतली तर तिसरी लाट येईलच का? जास्तीत जास्त कोरोना लसीकरण आणि कोरोना नियमांचं योग्य पालन केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय.