मुंबई दि.२५ – राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत 80 वर्षांची महिला संगमेश्वरमधील रहिवासी होती. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतरही आजार होते. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला.
राज्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट बाबतीत सध्या तरी मोठ्या प्रमाणावर रुग्ण नाहीत असं ते म्हणाले. डेल्टा व्हेरियंट बाबतीत सध्या 36 जिल्ह्यामधून नमुने घेण्याचे काम सुरु असून केंद्रीय संस्था NCDC ही राज्य सरकारला मदत करत आहे. सध्या तरी राज्यात कुठलेही निर्बंध लागणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.
दरम्यान आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.