डेल्टा व्हेरिएंट धोकादायक, काळानुसार तो बदलत आहे…….!
नवी दिल्ली दि.4 – जागतिक आऱोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाचे डेल्टासारखे व्हेरिएंट अधिक संक्रमक आहेत आणि सतत बदलत आहेत. ज्या देशांमध्ये कमी लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. त्या देशातील रुग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे, असं घेब्रेयेसस यांनी सांगितलं.
डेल्टा व्हेरिएंट कमीतकमी 98 देशांमध्ये आढळून आला आहे आणि कमी आणि जास्त लसीकरण झालेल्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. कठोर पालन करणे, तपासणी, लवकर निदान, विलगीकरण आणि वैद्यकीय सेवा यासारखे सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय अजूनही महत्त्वाचे आहेत, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलंय.अद्याप कोणताही देश धोक्याच्या बाहेर नाही. डेल्टा व्हेरिएंट धोकादायक आहे आणि काळानुसार तो बदलत आहे, ज्यावर सतत देखरेख करणे आवश्यक आहे, असं टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले.
दरम्यान, पुढील वर्षापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकांचं कोरोना लसीकरण व्हावं, यासाठी डब्ल्यूएचओ महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी जगातील नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.