#Accident
शॉर्ट सर्किटने ऊसतोड मजुराचे घर जळून खाक, केज तालुक्यातील घटना…..!

केज दि.8 – तालुक्यातील केकाणवाडी येथील ऊसतोड मजुराच्या घराला आग लागून त्यामध्ये संसार उपयोगी भांडी, धान्य, कंपड्यांसह रोख रक्कम असं सगळंच जळून खाक झाल्याची घटना बुधवारी ( दि. ७ ) रोजी दुपारी ३ वाजता घडली. गुरुवारी ( दि. ८ ) रोजी तलाठी चंद्रकांत कांबळे यांनी पंचनामा केला. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे सांगितले जात असून अंगावरील कपडे सोडता सर्वच जळाल्याने दान दानशूर व्यक्तींनी ऊसतोड मजूर कुटुंबाला आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
कांतीलाल आत्माराम चाटे यांना केवळ एक एकर शेती असल्याने ते ऊसतोडणी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी ( दि. ७ ) रोजी कांतीलाल हे शेतात तर त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेलेली होती. घरी कोणीच नव्हते. दुपारी ३ वाजता बंद घरातून धुराचा लोट उठला असता आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. परंतु घराचा दरवाजा बंद असल्याने आणि पत्र्यांना करंट लागत असल्याने काहीच करता आले नाही. फोन करुन वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले त्यानंतर काही तरुणांनी घरात प्रवेश करुन गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत घरातील जर्मन, पितळाची भांडी, कपडे, गहू, ज्वारी व उच्चल घेतलेले रोख वीस हजार रुपये आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्याची राख झाली. आधीच लॉकडाऊन त्यानंतर ऊसतोडीची उच्चल अधिक आणि धंदा कमी त्यामुळे आर्थिक संकटाशी सामना करत कसंबसं दोन वेळच्या जेवणाची तजवीज करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. या घटनेने अंगावरील कपडे सोडले तर काहीच शिल्लक ठेवलं नाही. त्यामुळे या ऊसतोड मजुराचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. या अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन यांना पुन्हा उभं करण्यासाठी मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान कांतीलाल चाटे यांनी दोन दिवसांपूर्वीच ऊसतोडीची १ लाख रुपये उचल घेतली होती. त्यातील ७० हजार रुपये कांहींच देणं होते ते देऊन कर्ज फेडले.३० हजारातील १० हजार हात उसने म्हणून एका मित्राला दिले. शिल्लक राहिलेले २० हजार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.