#Social
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बीड शहरात उभारण्यात यावा – संजय धुरंधरे
डी डी बनसोडे
July 8, 2021
बीड दि.8 – लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड शहरामध्ये अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी पत्रकार संजय धुरंधरे यांनी केली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहीरीच्या माध्यमातून लोककल्याणाचे मोठे कार्य केले आहे. तसेच महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महाराष्ट्राची व्हावी यासाठी शाहीरीच्या माध्यमातून लढा दिला आहे. दबलेल्या माणसांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून ते सोडविण्याचे काम अण्णाभाऊ यांनी केले आहे. गोरगरिबांच्या व्यथा आपल्या कथेतून मांडून त्यातूनच आपला नायक त्यांनी उभा केला आहे. ‘स्मशानातील सोनं’ ही अण्णाभाऊ यांची कथा लोकप्रिय झाली. अन्यायाला वाचा या कथेच्या माध्यमातून त्यांनी फोडली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कथा,कादंबऱ्या,प्रवासवर्णन,
चित्रपट,शाहिरी,पवाडे हेही लोकप्रिय झाली आहेत.
दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष जवळ येत असून गेली कित्येक वर्षापासून बीड शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी समाज करत आहे. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बीड शहरात उभारण्यात यावा आणि त्यांच्या कर्याचा बीड नगरपालिकेने कृतज्ञापूर्वक सन्मान करून समाजाची ही मागणी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पूर्ण करावी असे संजय धुरंधरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.