पवित्र पोर्टलद्वारे सुमारे 6100 पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती…….!
मुंबई दि.८ – राज्यातील शिक्षण सेवकांची रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत. लवकरच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यानुसार आता राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांची पदे आता भरली जाणार आहेत. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणा-या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.
शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पदभरती संदर्भातील निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता रिक्त असलेली शिक्षण सेवक पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर बंदी घातली होती.
दरम्यान गेल्यावर्षाच्या अखेरीस राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही भरती लवकरच पूर्ण होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार पवित्र पोर्टलद्वारे सुमारे 6100 पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.