#Education
व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना……!
डी डी बनसोडे
July 18, 2021
बीड दि.१८ – महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या इयत्ता १० वी पास झालेल्या गुणवत्ता यादीतील ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक सर्व विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने व्यावसायिक उच्च शिक्षण पूर्व तयारी करिता प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९०% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे विशेष अनुदान योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. सदरील योजना MH-CET.NEET JEE, मेडिकल. इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारी साठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आहे. ज्या विद्यार्थीचे पालक दारिद्र्य रेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम २,५०,०००/ (अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी आहे व मुख्यता लाभ हा त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटीत क्षेत्रात, कमी पगारावर, कंत्राटी पद्धतीने कामे करतात.
सन २०२१ इयत्ता १० वी च्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील. तसेच संबंधीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ‘बार्टी’ मार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येतील. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी SSC CBSE ICSE बोर्डामध्ये मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील शासकीय नोकरीत आहेत ते विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती करीता पात्र राहणार नाहीत. सदर योजना ही सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात व यापुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ देय असल्याची माहिती महासंचालक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बाटी पुणे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.