बीड दि.१८ – परळी तालुक्यातील मरळवाडी येथील शहरात येऊन दूध विक्री करणाऱ्या एका दुधवाल्याच्या मोटारसायकला रान डुकराची धडक बसल्याने मोटारसायकल वरील एकाचा जागीच जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मरळवाडी येथील दुध विक्रेते दररोज शहरात दुध विक्री करतात. नेहमीप्रमाणे काशीनाथ श्रीरंग आघाव (वय ४५) रविवारी (दि.१८) सकाळी परळीकडे दूध घेऊन जात असताना त्यांच्या गाडीसमोर मरळवाडी नजीक असलेल्या पिराजवळ अचानक रानडुक्कर आडवे आले. या रानडुक्करची मोटारसायकलला जोराची धडक बसल्याने काशीनाथ आघाव दुचाकीवरून खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्री. आघाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांकडे दिल्यानंतर मरळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान मागच्याच महिन्यात केज – बीड रोडवर हरीण दुचाकीला आडवे आल्याने झालेल्या अपघातात दहिफळ येथील आसाराम विष्णू ठोंबरे या सैनिकाचा मृत्यू झाला होता.