वीजचोरी आणि थकीत वीज बिलावर महावितरण चा नामी उपाय…..!
बीड दि.२१ – घरगुती वीज ग्राहकांच्या वीज मीटरच्या तक्रारींवर राज्याच्या ऊर्जा विभागाने स्मार्ट मीटरचा तोडगा काढला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या राज्य महानगरात प्राथमिक स्तरावर हे मीटर बसविण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी (ता. २०) मुंबईत या प्रश्नावरील बैठकीत दिले.
मोबाईलच्या सिमकार्ड वापराप्रमाणे प्रीपेड व पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येणार आहे. परिणामी वीज वापरानुसारच बिल येईल.
तसेच प्रिपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत, तेवढीच वीज वापरता येणार आहे. त्यामुळे विजेची बचत होण्यास मदत होणार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे.मीटरमध्ये फेरफार करून कुणी वीजचोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला मिळणार आहे. यामुळे वीजचोरीस आळा बसेल. तसेच विजेचा काटकसरीने विवेकी वापर करण्याला प्रोत्साहन मिळेल. दूरस्थ पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल, ज्यामुळे खर्चावरही नियंत्रण येणार आहे.
दरम्यान अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीज जोडणी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने तिची व्याप्ती वाढविण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिले.तसेच ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता ती सर्वसमावेशक करण्याचा प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले.