आपला जिल्हा
डी डी बनसोडे
July 21, 2021
”संकल्प निरोगी बीड” अभियानांतर्गत केज शहरात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी……..!

केज दि.२१ – उद्या दि.२२ रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संकल्प निरोगी बीड अभियान राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने केज उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनेही विविध उपक्रमांचे आयोजन केले असून जास्तीतजास्त नागरिकांनी सदरील अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी केले आहे.
संकल्प निरोगी बीड अभियानांतर्गत गुरुवारी (दि.२२) शहरातील तहसिल, पंचायत समिती, न्यायालय तसेच पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य (ब्लड,शुगर वजन इत्यादी) तपासणी करण्यात येणार आहे.तसेच उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती मातांची (सोनोग्राफी,ब्लड टेस्ट इत्यादी) तपासणी व उपचार, विद्यार्थी नोंदणी व संदर्भीय सेवा, असंसर्गजन्य (शुगर, लकवा, मिर्गी, कॅन्सर इत्यादी ) आजाराचे स्क्रिनिंग तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

त्याच बरोबर बिनटाका कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले असून विशेष बाब म्हणजे नातेवाईक क्लिनिक उपक्रमांतर्गत रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिर आणि कर्मचारी आरोग्य तपासणी उपक्रम वगळता इतर उपक्रम नियमित चालू राहणार असून परिसरातील गरजू नागरिकांनी सदरील अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.