बीड दि.२२ – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व १,०००/ रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त साध्या करावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, श्री एच. एस. महाजन बीड यांनी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 19/12/2018 रोजी सायंकाळी 5.45 वा. शिरुर तालुक्यातील मौजे पिंपळ्याची वाडी शिवारातील लाकडधरा नावाचे शेतात आरोपी प्रकाश मारुती सानप, वय 21 वर्ष, रा.पिंपळ्याची वाडी, ता. शिरूर, जि.बीड याने यातील फिर्यादी पिडीत अल्पवयीन मुलगी ही विहीरीवर पाणी शेंदत असताना पाठीमागून तीला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर घटनेच्या अनुषंगाने पिडीत मुलीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शिरुर अंतर्गत गु.र.नं.304/2018 कलम 354(अ) (1) भादंवि सह कलम 8 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. आर. काझी यांनी करून आरोपीताविरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा. न्यायालयात अंतीम दोषारोप पत्र सादर केले होते.
दरम्यान सदर प्रकरणाची सुनावणी मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा. न्यायायाने आरोपीतास कलम 8 बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनीयम सन 2012 अंतर्गत दोषी धरून तीन वर्ष सश्रम करावास व 1,000/- रु. दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सदरील प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहा, सरकारी वकील एस. व्ही. सुलाखे यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज सफौ सी. एस. इंगळे यांनी पाहिले.