क्राइम
अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार…..!
केज दि.23 – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पुणे येथून पळवून नेऊन तिच्यावर चार महिने वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी पुणे येथून मुलीची सुटका करीत आरोपीला जेरबंद केले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोस्कोसह अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असून आरोपीला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केज तालुक्यातील एका गावातील साडेसोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस आरोपी श्रीराम संतराम वरपे ( रा. कोरडेवाडी ता. केज ) याने २२ मार्च २०२१ रोजी मध्यरात्री फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीचा तीन – चार वेळा तपास काढून ही ते न मिळाल्याने पुण्याहून पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. दरम्यान, आरोपी व मुलगी ही लोणीकाळभोर येथे असल्याची माहिती मिळताच २१ जुलै रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, जमादार दिनकर पुरी, पोलीस नाईक मंदे यांचे पथक पुण्याला रवाना झाले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास या पथकाने छापा मारून आरोपी श्रीराम वरपे यास मुलीसह ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस चौकशीत श्रीराम वरपे याने या अल्पवयीन मुलीस लोणीकाळभोर ( जि. पुणे ) येथे नेऊन तिला एका रुममध्ये ठेवत चार महिन्यापासून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी सदर गुन्ह्यात बलात्कार, पोस्को व अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी श्रीराम वरपे यास केजच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.