मतदारांना पैसे वाटल्या प्रकरणी खासदार तुरुंगात……..!
हैदराबाद दि.27 – सत्ता म्हटलं की निवडणुका आणि निवडणुका म्हटलं की पैसा, असं एक समीकरण आता भारतात तयार झालंय. निवडणुकीत जिंकण्यासाठी उमेदवार संपुर्ण ताकद लावतात. तर याकाळात पैसा देखील पाण्यासारखा ओतला जातो. अनेक लोकप्रतिनिधी पैसा वाटून मत मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच आता मतदारांना पैसे वाटल्यानं खासदारच तुरूंगात गेल्याची मोठी घटना घडली आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही कार्यकर्ते पैसे वाटत होते. त्यावेळी कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची खबर पोलिसांना लागली. हे कार्यकर्ते बर्गमपहाड मतदारसंघात 500 रूपयाला एक मत या दराने पैसे वाटत होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडलं. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी लोकसभेच्या उमेदवार मलोत कविता यांचं नाव घेतलं.त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. न्यायालयात पोलिसांनी पुराव्यासह पैसे वाटप झाल्याचं सिद्ध केलं. तर त्यातील एका कार्यकर्त्याने देखील न्यायालयात पैसै वाटप केल्याचं मान्य केलं. खासदार मलोत कविता यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर हैदराबादमधील तेलंगाणा राष्ट्र समितीच्या खासदार मलोत कविता यांना न्यायालयानं 6 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, निवडणुकीत पैसे वाटल्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीला शिक्षा झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीही अनेक नेत्यांवर पैसे वाटल्याचे आरोप झाले होते. परंतु त्यातील कोणत्याही नेत्याला शिक्षा झाली नव्हती. या प्रकरणात अचुक काम केल्यानं तेलंगणा पोलिसांचं कौतुक देखील केलं जात आहे.