
केज दि.31 – तालुक्यातील दहिफळ वड माऊली रस्त्यालगत असलेल्या लिबांचीवाडीकरांच्या नशिबी चिखलातूनच वाट शोधण्याची वेळ आजही कायम आहे. निवडणुका आल्या की रस्त्याचे आश्वासन दिले जाते मात्र त्याची पूर्तता होत नसल्याने ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत असून रस्त्याअभावी लिबांचीवाडी विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे.
दहिफळ वडमाऊली रस्त्यावरील असणाऱ्या लिंबाचीवाडी हा चार किलोमीटरचा रस्ता आहे.मात्र दीड किलोमीटर दोन वर्षापूर्वी झाला आणि बाकी राहिलेला रस्ता कित्येक वर्षापासून दुरावस्थेत अडकला असून पावसाळ्यात तर या रस्त्यावर चालता सुद्धा येत नाही. निवडणुकीच्या वेळी प्रत्येकाकडून या रस्त्याचे भांडवल करून आश्वासने दिली जातात. मात्र अजूनही या रस्त्याची दैना कायम आहे. रस्त्याचे काम पूर्ण करून ग्रामस्थांचे हाल थांबवावेत अशी मागणी सुधाकर मोरे, पप्पू माने, बाळासाहेब हराळे, बाजीराव मोरे यांनी केली आहे.