आज दुपारी चार वाजता 12 वी चा निकाल होणार जाहीर, मात्र ”या” विद्यार्थ्यांना असणार दोन संधी……!

पुणे दि.३ – 12 वीचा निकाल आज जाहीर होणार असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल आज दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. जाहीर होईल.असे वर्षा गायकवाड यांनी म्हंटल आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले असल्यानं निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.
अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
Maharashtra.nic.in
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे
सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.
दि.२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.