क्राइम
केज तालुक्यातील इसमाचे एक लाख रुपये पळवले…….!
केज दि.३ – तालुक्यातील लिंबाचीवाडी येथील रहिवासी भरत दशरथ माने यांनी भावाच्या उपचारासाठी बीड येथील ऍक्सिस बँकेतून काढलेल्या दोन लाख रुपयांपैकी पिशवीत ठेवलेले एक लाख रुपये मोटारसायकल वरील दोघा अज्ञातांनी पळवल्याची घटना दि.२ ऑगस्ट रोजी बीड शहरात घडली असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
तालुक्यातील लिंबाचीवाडी येथील भरत दशरथ माने यांच्या भावाला शॉक लागल्याने त्यांना बीडच्या एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांच्या उपचारासाठी भरत माने त्यांच्या तीन मित्रांसह बीडला गेले होते. उपचाराच्या खर्चासाठी माने यांनी दि.२ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान बीड शहरातील ऍक्सिस बँकेतून दोन लाख रुपये उचलले. त्यापैकी 500 च्या नोटा असलेले एक लाख रुपये त्यांनी पॅन्ट च्या खिशात ठेवले व शंभर शंभर च्या नोटा असले एक लाखाचे 10 बंडल व पासबुक त्यांनी एका लाल रंगाच्या कापडी पिशवीत ठेवले होते. पैसे उचलून ते व त्यांचे मित्र बँकेच्या बाहेर रोडवर आले असता त्या दरम्यान एका युनिकॉर्न दुचाकीवर 30 ते 40 वयोगटातील दोघे अज्ञात माने यांच्या जवळ आले व डाव्या हातातील पिशवी ओढून घेऊन गेले.
दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर भरत माने व त्यांच्या मित्रांनी त्या मोटारसायकल वरील दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागू शकला नाही. सदर प्रकरणी भरत माने यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.