राज्यातील पूर परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर पुन्हा बदलली परीक्षेची तारीख…….!

मुंबई दि.५ – कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महत्वाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी होऊ लागल्याने लांबणीवर पडलेल्या परीक्षा पुन्हा होऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने देखील आता पुढे ढकललेल्या परीक्षा पुन्हा घेण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आतापर्यंत तीनवेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 9 ऑगस्ट रोजी या परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र, महाराष्ट्र शासनाने पुन्हा या तारखेत बदल केला आहे. महाराष्ट्र शासनाने पाचवी आणि आठवीची परीक्षा आणखी चार दिवस पुढे ढकलली आहे. 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखांमध्ये आतापर्यंत जवळपास चारवेळा बदल करण्यात आला आहे. दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. कोरोनामुळे परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करत परीक्षा 8 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, 8 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दलाची परीक्षा होत असल्यामुळे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र, आता पुन्हा या तारखेत बदल करत 12 तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.