क्राइम
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी…..!

केज दि.८ – एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. युसुफवडगाव पोलिसांनी पुणे येथून पीडित मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका करीत आरोपीला जेरबंद केले. याप्रकरणी बलात्कार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील साडेसोळा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीस विकास वसंत घाटपारडे ( रा. मुरुड ता. लातूर ) याने २० फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दोघांचे मोबाईल बंद असल्याने त्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. दरम्यान, त्यांच्या पैकी मुलीच्या मोबाईलवर कंपनीचा मॅसेज आल्यानंतर पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळाले. त्यावरून जमादार कल्याण सोनवणे, पोलीस नाईक पांडुरंग वाले, कोंडीबा म्हेत्रे यांच्या पथकाने पुणे शहरातील विमान नगर भागात छापा टाकून पीडित मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका करीत आरोपी विकास घाटपारडे यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
दरम्यान, आरोपी विकास घाटपारडे याने या पीडित मुलीस सुरुवातीला मुरुड आणि तेथून पुण्याला नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे मुलीच्या जबाबवरून उघडकीस आले. याप्रकरणी सदर गुन्ह्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी विकास घाटपारडे यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील तपास फौजदार सीमाली कोळी करीत आहेत.