उद्या दुपारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम…….!
बीड दि.८ – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे आर्थिक लाभ मिळत असतो. या योजनेअंतर्गत हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असते. या योजनेचा पुढील हप्ता आता 9 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या हप्त्याचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच देशातील नागरिकांना पंतप्रधान यावेळी संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित राहणार आहेत. 9 ऑगस्ट रोजी 19,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरीत होणार असून हा हप्ता 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपये इतका सन्मान निधी हस्तांतरीत करण्यात आला आहे.
दरम्यान, 19 फेब्रवारी 2019 रोजी ही योजना सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला 3 कोटी 16 लाख 5 हजार 539 शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता दिला गेला होता. या योजनेअंतर्गत दरवर्षी 2 हजार रुपयांच्या तीन समान मासिक हप्त्यांमध्ये याचं वितरण केलं जातं. म्हणजेच वर्षात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होतात.