दोघांनीही एकमेकांच्या हाताला दोरी बांधून घेतला टोकाचा निर्णय……!
बीड दि.९ – नववीतील मुलगी आणि अकरावीतील मुलगा या अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली आहे. मूळचे चंद्रपूरचे असलेल्या या दोघांनी गडचिरोलीत जाऊन हे टोकाचं पाऊल उचललं. आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर या दोघांचे मृतदेह आढळले आहेत. मुलीचं वय 15 तर मुलाचं वय 17 वर्ष आहे. हर्षल आणि हर्षदा (नावं बदललेली) यांचं एकमेकांवर प्रेम होतं. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या चिंचोली बुजुर्ग इथले रहिवासी होते. या दोघांचे मृतदेह गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर आढळले. काल संध्याकाळी समोर आलेल्या प्रकाराने एकच खळबळ उडाली. दोघांनीही एकमेकांच्या हाताला दोर बांधून गडचिरोली येथील आरमोरीच्या पुलावरून वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हर्षल आणि हर्षदा हे दोघेही 3 ऑगस्टपासून बेपत्ता होते. दोघांच्या कुटुंबियांनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. हे दोघेही चंद्रपुरातून गडचिरोलीपर्यंत जातील याचा अंदाजही कुणी बांधला नाही. हे दोघे कुठेही सापडत नसल्याने दोघांच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळवलं होतं.ब्रम्हपुरी पोलिसांनी गडचिरोली पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. त्यांनी त्याबाबतचा तपास केला. त्यादरम्यान आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर दोन मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिासांनी अधिक चौकशी केल्यानंतर हे मृतदेह हर्षल आणि हर्षदाचे असल्याचे समोर आले आहे.