15 वर्षीय मुलाचा खून, मृतदेह लपवला उसाच्या शेतात…….!
बीड दि.११ – गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी येथे एका १५ वर्षीय मुलाचा शेतीच्या वादातून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुलाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ऊसाच्या शेतात लपविण्यात आला होता.तलवडा पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी (दि.१०) रात्री मुख्य आरोपीला अटक केली असून चौघांचा शोध सुरु आहे.
भेंडटाकळी तांडा येथील संदिप सोपान चव्हाण (वय-१५) हा शनिवारी आपल्या शेतात एकटा गेला होता.यावेळी शेतीच्या बांधावरून संदीप चव्हाण आणि किशोर लोंढे यांच्यात वाद झाले.संदीप हा शेतात एकटा असल्याने किशोर व त्याचे साथीदार भगवान विठ्ठल लोंढे,बाळू बळीराम लोंढे, आकाश भगवान लोंढे,सोमनाथ भगवान लोंढे यांनी संगमताने संदीपचा खून करून त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात लपविला.रविवारी (दि.८) सकाळी राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली.नंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता संदीपचा मृतेदह आरोपीच्या ऊसाच्या शेतात आढळून आला.मंगळवारी (दि.१०) रात्री याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या किशोर लोंढे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने हे करीत आहे.
संदीप चव्हाण प्रकरणात ३०२ कलमाखाली पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी रात्री मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते.अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल आला नसून संदीपच्या अंगावर एकही जखम नाही.त्यामुळे त्याची हत्या कशी करण्यात आली हे अहवाल आल्यानंतर समोर येईल असे पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी असलेल्या किशोर लोंढे याला गेवराई न्यायालयात आज (दि.११) हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.