शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती मिळणार स्मार्टफोन मध्ये…..!
नवी दिल्ली दि.१५ – केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक मोबाईल अॅप्लिकेशन्स सुरु करण्यात आली आहेत. या अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या पद्धती, तंत्रज्ञान आणि योजनांविषयी सातत्याने माहिती पुरवली जाते. हल्ली स्मार्टफोन आणि इंटरनेट अगदी खेड्यांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांनाही ही अॅप्स वापरणे सुलभ झाले आहे. सध्या प्ले स्टोअरवर शेतकऱ्यांसाठीची अनेक अॅप्स असली तरी मोजकी अॅप्स ही शेतकऱ्यांसाठी खरंच फायदेशीर ठरू शकतात.
किसान सुविधा अॅपवर तुम्हाला शेतीसंबंधीच्या माहितीसोबतच इतर बरीच माहिती उपलब्ध आहे. या अॅपवर पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज पाहता येतो. याशिवाय, पिकांचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ले, पीक संरक्षण अशा गोष्टींविषयीही तुम्हाला बरीच माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन आणि बाजारात पीक कधी विकायचे, याचा अंदाज येण्यास मदत होते. याशिवाय, किसान सुविधा अॅपवर कृषी तज्ज्ञ आणि जाणकरांकडून सल्लेही दिले जातात.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि राष्ट्रीय केळी अनुसंधान केंद्राकडून केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अॅप चालवले जाते. या अॅपचे नाव बनाना प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी असे आहे. हे अॅप सध्या हिंदी, इंग्रजी आणि तामिळ भाषेत उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, माती, केळीची रोपे, त्यांना पाणी कसे द्यायचे अशा सर्व गोष्टींची माहिती दिली जाते.
मेघदूत मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत शेतीविषयीची माहिती उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये हवामान, पिकं आणि पशुपालनाच्या समस्यांचे निराकरणही केले जाते. भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय कृषी समिती यांच्याकडून संयुक्तपणे हे अॅप चालवले जाते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी अॅपवरील माहिती अपडेट केली जाते.