स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा अनोख्या पद्धतीने सन्मान……..!
अकोला दि. 15 – जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला. बच्चू कडू यांनी शहीद जवानांच्या वीरमातांचे पाय धुतले. तसेच बच्चू कडू यांनी चांदीच्या ताटात शहिदांच्या कुटूंबियांना शाही भोजन दिलंय. या अनोख्या पंगतीत बच्चू कडू स्वत:च वाढपीही झाल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू यांनी हॉटेल ग्रीनलँड येथे हा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
लढवय्या अन् आक्रमक नेता अशी बच्चू कडू यांची ओळख आहे. पण कडू यांचं एक हळवं अन संवेदनशील रूप आज पहायला मिळालंय. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासून बच्चू कडूंचे शासकीय कार्यक्रम होते. मात्र, दुपारी ग्रीनलँड हॉटेलच्या सभागृहात पालकमंत्री बच्चू कडूं यांच्यातील एक वेगळं रूप पहायला मिळालं. कडू यांनी शहिदांच्या कुटूंबियांचे पाय धुत आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अकोला शहरातल्या ग्रीनलँड हॉटेल सभागृहातील वातावरण भावूकतेच्या हळव्या क्षणांनी भारावलं होतं. शहिदांच्या कुटुंबीयांना जेवण्यासाठी पाट तसेच पाटावर चांदीचं ताट, ताटातले पंच-पक्वान अशी मेजवानी करण्यात आली होती. यामध्ये शहिदांच्या कुटुंबीयांना बच्चू कडू आग्रहानं जेवण वाढत होते. जेवणाच्या कार्यक्रमानंतर कडू यांनी विरांच्या माता आणि पित्यांना शाल अन् साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी अशा अनोख्या सन्मानानं शहिदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
दरम्यान, ग्रीन्डलँड हॉटेलमधील या कार्यक्रमात एकूण 28 शहिदांच्या कुटुंबियांना बोलविण्यात आलं होते. तर या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च बच्चू कडूंनी त्यांच्या वैयक्तिक खर्चातून केला.