डेल्टा प्लस ने चिंता वाढवली……..! अधिक सतर्कता बाळगण्याची गरज…..!
मुंबई दि.१७ – कोरोना आटोक्यात येत असतानाच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. डेल्टाच्या वाढत्या शिरकावामुळे राज्यात चिंतेची लाट उसळली आहे. कोरोना विषाणूचा हा व्हेरिएंट बाकी व्हेरिएंटपेक्षा जास्त प्रमाणात पसरत असल्याचं समोर येत आहे. मात्र याविषयी जास्त चिंता करण्याची किंवा घाबरण्याची गरज नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आणखी 10 रुग्णांची भऱ त्यामध्ये पडली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंटविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, राज्य सरकार हे आरोग्य विभाग आयसीएमआरनं दिलेल्या प्रोटोकॉलनुसार सर्व काळजी घेत आहे. सर्व डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या कोरोना रुग्णांना आयसोलेट केलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण होत असल्याचं समोर येत आहे. मात्र असं असलं तरी काही काळजी करण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत हा अधिक वेगानं फैलावत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेनं अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा इशारा दिला आहे.