जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळेल……!
नवी दिल्ली दि.२० – सध्या संपूर्ण देशात असलेले वीज मीटरचे बिल दरमहिन्याला तयार होत असते. त्यांचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न झाल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडवण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे. आता संपूर्ण देशात स्मार्ट मीटर लावण्यात येतील. काही दिवसांपूर्वी वीज मंत्रालयाने सरकारच्या सर्व मंत्रालयांना प्री पेड मीटर बसवण्याची सूचना केली होती. आता वीज मंत्रालयाने याबाबत एक नोटीफिकेशन काढले आहे. प्रीपेड मीटर लावल्याने वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारेल अशी आशा आहे.
प्रीपेड मीटर अगदी मोबाईलच्या सीम कार्ड सारखे काम करते. जसे आपल्याला महिन्याला कॉलिंग किंवा डेटा वापरण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो. त्यानंतर ठरावीक दिवसांपर्यंत किंवा तुमच्या वापरानुसार रिचार्ज सुरू राहतो. त्यानंतर संपतो. तसेच वीज बिल प्रीपेड मीटर बाबत असणार आहे. तुम्हाला या मीटरला आधी प्रीपेड रिचार्ज करावा लागेल. त्यानुसार तुमच्या वापरानुसार पैशांची कपात होत राहील.
दरम्यान, सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतीशी संबधीत कामे वगळता देशात सर्वासाठी मार्च 2025 पर्यंत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येतील.