#Social
दैनिक वार्ता चे पुरस्कार जाहीर, 31 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण…….!
अंबाजोगाई दि.21 – गेल्या 13 वर्षापासुन सातत्याने बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्या दैनिक वार्ता समुहाचा 13 व्या वर्धापन दिन हा येत्या 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. 13 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दिल्या जाणार्या विविध पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्रातील थोर विचारवंत व व्याख्याते इंद्रजित देशमुख यांच्या व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे.
यंदाच्या सन 2021 च्या पुरस्काराची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. नगरभूषण पुरस्कार हा अंबाजोगाई येथील युवा उद्योजक प्रदिप ठोंबरे यांना, सद्भावना पुरस्कार हा पुणे येथील यशस्वी उद्योजक संतोष कुंकूलोळ यांना तर युवा गौरव पुरस्कार हा पुणे येथील बालहृदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगावकर यांना, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता एन.टी.पाटील यांना सेवागौरव तर मेजर डॉ.नितीन पोतदार यांना विशेष गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समुहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केले आहे.
बीड जिल्ह्याच्या पटलावर वार्ता समुहाने वेगळी छाप पाडली आहे. नवनवे तंत्रज्ञान अवगत करून त्या माध्यमातून समाजासमोर वेगळे काही तरी देण्याचा प्रयत्न राहिला आहे. गेल्या तेरा वर्षापासुन सातत्याने माध्यम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बीड जिल्ह्याचा मानबिंदु ठरण्यात वार्ता समुहाने यशस्वीता गाठली आहे. सकारात्मक पत्रकारिता हा केंद्रबिंदू माणून वेगवेगळ्या घटकांना न्याय देवून प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. दरवर्षी वार्ता समुहाचा वर्धापन दिन हा फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो परंतु कोरोनाची दुसरी लाट ही 15 फेब्रुवारी नंतर मोठ्या प्रमाणात आल्याने त्यावेळी कार्यक्रम स्थगित करण्यात आला. तो कार्यक्रम येत्या मंगळवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद, अंबाजोगाई येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे राहणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण हे महाराष्ट्रातील थोर विचारवंत, व्याख्याते इंद्रजित देशमुख हे असणार आहेत. प्रमुख अथिती म्हणून विधान परिषदेचे आ.संजयभाऊ दौंड, स्वा.रा.ती. ग्रामिण रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा तिरूमला उद्योग समुहाचे प्रमुख सुरेश कुटे, केज येथील जिवन शिक्षण परिवाराचे सचिव हारूणभाई इनामदार, उद्योजक शिवाजीभाऊ सिरसाट, उद्योजक प्रतापदादा पवार, त्वचाविकार तज्ञ डॉ.विजयकुमार फड, आय.एम.ए.संघटनेचे अंबाजोगाई अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले, बालरोगतज्ञ डॉ.विजय लाड, काँग्रेस किसान आघाडीचे विभागीय अध्यक्ष अॅड.माधव जाधव, सामाजिक कार्यकर्ते जी.डी.थोरात, अ.भा.म.प.जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ज्यांनी अंबाजोगाई शहराचे नाव उज्वल करून शहराची प्रतिमा उंचावली आहे. अशा सद्गुणी व्यक्तीमत्वांना वेगवेगळे पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये नगर भूषण पुरस्कार हा अंबाजोगाई येथील तरूण उद्योजक प्रदिप ठोंबरे यांना दिला जाणार आहे. ठोंबरे यांनी बांधकाम क्षेत्रात कमालीची भरारी घेवून गुणवत्तेचा दर्जा राखला आहे. शिवाय एक मोठा दुग्धजन्य उत्पादक पदार्थांचा मोठा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. बांधकाम व्यवसायासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे. म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. पुणे येथील उद्योजक संतोष कुंकूलोळ यांना सद्भावना पुरस्कार दिला जातो आहे. संतोष कुंकूलोळ हे अंबाजोगाईचे भूमिपुत्र असून त्यांनी अंबाजोगाई शहराची नाळ कधीही तुटू दिली नाही. सातत्याने या शहराच्या भल्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी राहून सुद्धा त्यांनी अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी आपले योगदान दिलेले आहे. म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. युवा गौरव हा पुरस्कार पुणे येथील बालहृदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगावकर यांना दिला जाणार आहे. पंकज सुगावकर हे अंबाजोगाईचे भूमिपुत्र असून पुणे येथे ते सह्याद्री , रूबी,बिर्ला हॉस्पिटल व स्वतःच्या रूग्णालयात मराठवाड्यातून गेलेल्या बालरूग्णांची सेवा करतात. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया असेल किंवा त्या संबंधी उपचार असतील ते मोफत कसे करता येतील यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. साधारणतः 4 हजार लेकरांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अशा व्यक्तीमत्वाला हा पुरस्कार दिला जातोय. तर तत्कालीन कार्यकारी अभियंता एन.टी.पाटील यांनी अंबाजोगाई शहरात सहा वर्ष बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून सेवा दिलेली आहे. सहा वर्षामध्ये नजरेत भरण्यासारखे काम त्यांच्या हातुन झालेले आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांनी हात आखडता घेतलेला नाही. उलट महापुरूषांच्या विचारांचा अंगीकार करून तो आत्मसात करून तो विचार पटलावर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच मेजर डॉ.नितीन पोतदार यांचा यंदा विशेष गौरव केला जाणार आहे. डॉ.पोतदार यांनी गेली चौदा वर्ष वैद्यकीय सेवा केलेली आहे. रूग्णसेवा करणं हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. परंतु एक माणूस म्हणून सुद्धा त्यांनी चांगले काम या भागात उभारले आहे. कोरोनाच्या काळात असंख्य गोर-गरीबांना व सर्वसामान्यांना अन्नधान्याच्या किट वाटप केल्या. तसेच होळ येथील एका म्युकर मायक्रोसीसच्या रूग्णाला भरीव आर्थिक मदत करून त्याचा जीव वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न हा माणूसकीचे दर्शन घडवितो. म्हणून त्यांचा विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. हा पुरस्कार वितरणाचा सोहळा मंगळवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद, अंबाजोगाई येथे कोरोनाचे सर्व नियम पाळुन संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समुहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांच्यासह अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई, तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा अंबाजोगाई व गुडमॉर्निंग ग्रुप अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले आहे.