#Social
संविधान वाचून रक्षाबंधन साजरा करू या………!
रक्षाबंधन खऱ्या अर्थाने रक्षा म्हणजे रक्षण करणे होय. आपल्याकडे दरवर्षी प्रमाणे रीतीवाज, चालीरीती आपण तशाच पुढे नेत असतो. आणि मराठी महिना श्रावण महिना हा तर विचारू नका नुसते उपवास. लिखाणातून सर्व बहिण भावांना खऱ्या प्रेमाचे नाते हा राखी “धागा” टिकून टिकवतो का ? सर्व प्रथम मला यातून कुणाची भावना दुखवायची नाही तर सत्य सर्वांनी स्वीकारले पाहिजे. तरी यातील काही गोष्टी या योगायोग समजावा. भारताचे संविधान हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून लिहिले आहे. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना देशाला प्रधान करण्यात आली. व 26 जानेवारी 1950 रोजी भारतात भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. मला वाटते सर्व भारतीय महिलांनी या राखी पौर्णिमा ला संविधान प्रास्ताविक वाचून, एकमेकिंना राखी बांधून साजरा करावा. संविधान हे आपले रक्षण करते. रक्षाबंधन व महिला संपत्ती अधिकार याचे काही संबंध आहे का? मला पडलेला प्रश्न ? आज एकल महिला संघटना मागील पाच वर्षापासून मराठवाड्यात काम करत आहे. आणि संपत्ती, आरोग्य, हिंसाचार, शिक्षण आणि रोजगार यावर काम करत आहे परंतु जास्त प्रमाणात समस्या ह्या कौटुंबिक हिंसाचार व संपत्ती अधिकार हीच जास्त दिसते. जी आई, बहिण, मुलगी, पत्नी, काकू, सून, अशी कोणत्याही रूपात बरोबर असते, तेव्हा त्या स्त्रीचा त्या कुटुंबात किती संपत्तीत अधिकार दिला आहे हे तपासणे, सासर किंवा माहेर या दोन्ही ठिकाणच्या संपत्तीत अधिकार घटनेने दिलेला आहे, जर कायदा आहे, त्याला आपण स्वीकारले पाहिजे, आणि भविष्यात महिलांच्या हाल होण्या पासून माहेर वाचवू शकते, जे आज महिलांवर मोठया प्रमाणात हिंसा, अत्याचार ही प्रकरणे थांबवण्याचा मोठा वाटा असेल. आज तिची पोटाची खळगी भरण्यासाठी होणारी दयनीय अवस्था कमी होईल, तिला एक भक्कम आधार मिळेल. तरी आज समाजात एकल व इतर सर्व महिलांना कोणताच, आदर ना सन्मान, ना हक्क, का मिळत नाही ? आणि खरे पाहिले तर कुटुंबाचा मुख्य आधार *महिलाच* आहे असे माझे मत आहे. आज सामाजिक काम करत असताना हजारो महिलांची संपत्ती विषयीचे अडचणी महिला स्वतः सांगतात. *उदाहरणार्थ* चार भाऊ व एक बहीण थोडी बहीण कमी शिकलेली व कमी वयातच तिचे लग्न लावून दिले कालांतराने काही वर्षातच दोन पदरात मुली टाकून आजाराने, व्यसनाने पतीचे निधन झाले. आणि अगदी पंचवीस वयातच वैधव्य आले. आई वडील, चार भाऊ, भाऊजया, भाचे, भाच्या असा मोठा परिवार. या परिवारात दोन भाऊ शहरात राहतात, दोन भाऊ गावाकडे राहतात. पतीचे निधन झाल्याच्या नंतर पतीच्या एलआयसी चे पैसे भावाने हडप केले व दोन्ही छोट्या मुलींचे लग्न अल्पवयात त्यांचे व्यवस्थित न पाहता लग्न लावून दिले. आणि आज अशी तिची दयनीय अवस्था झाली. आई वडील नाही, भाऊ वेगळे राहतात, सगळ्यांनी आपापले प्रपंच थाटले, परंतु वडिलोपार्जित भरपूर शेती असतानाही या बहिणीला शेतीमध्ये अधिकार दिलेला नाही. तिच्या सह्या घेऊन तिला संपतीतून बेदखल करण्यात आले. मग आज तिला ना शेती आहे, ना घर आहे, ना कोणाचा आधार आहे, ना भविष्याची काही तरतूद आहे, चार घरची धुणीभांडी करायची, कोणाच्यातरी चार घास खायची अशा पद्धतीने हीच जगणं सूरु झाले. अशीही आमच्या बहिणीची व्यथा. भावांनो राखी बांधण्याचे ढोंग करू नका, खरच तुम्ही बहिणीला मानत असाल तर तिचा हिस्सा स्वखुशीने वाद न घालता द्या मग पटेल खरा भाऊ कोण? तुमचे बहिणी वरचे प्रेम दिसते किंवा हे दाखवण्यापुरते नाही हे पटते किती भाऊ पुढे येतील ? या राखी पौर्णिमेच्या शुभ दिनी किती भाऊ आपल्या बहिणीला हिस्सा देण्यास तयार होतील ? तुम्ही भाऊ रक्षण हा शब्द सोडाच कितीतरी महिलाच पुरुषांचे रक्षणकर्त्या झालेल्या दिसतात आहेत. अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीत कोणताही पुरुष पुढे येऊन या गोष्टीचा स्वीकार करू शकेल वाटत नाही. ज्या घरात एकल महिला आहे त्या कुटुंबातील सदस्यांची वागणूक तिच्यासोबत कशी असते हे सांगायची गरज नाही. आम्ही उदाहरणे पाहिले आहेत. लेकीच्या पोटगीच्या पैशावर संसार करणारे मामा बहिणीच्या नवऱ्याच्या विमाच्या पैशावर भावाने शेती विकत घेतलेली अशी एक ना अनेक उदाहरणे आम्ही पाहतो. भावाच्या सुखासाठी त्याच्या प्रत्येक अडचणीत बहीण साथ देते, पण भाऊ मात्र संकटात तोंड फिरवतो, आणि जेव्हा बहीण कायद्याने संपत्तीत अधिकार मागते, तेव्हा ती वाईट समजली जाते, आज जास्तीत जास्त प्रकरणे कोर्टात ही संपत्तीत हिस्सा मिळवण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या माझ्या भगिनी झिजवत आहेत, हाच का तो भाऊ, हाच नवरा, हाच सासरा, ही सर्व पुरुष समाज तिच्या विरोधात उभे राहतात का ? जे काही जवळ आहे ते सर्व पैसे ती कोर्टात खर्च करते आणि वेळ आली तर तिचे निधन ही होते पण संपत्ती तिला भेटत नाही. म्हणजे कायदा असून ही अमलबजावणी होत नाही ही खंत आहे. ज्या बहिणी माहेरी राहतात. तिला भावाला तोंड दाखवू नये अशी ताकीद केली जाते. तिचा मान तर दूरच तिने फक्त त्या घरामध्ये शेतीची कामे, शेण काढणे, गोठा साफ करणे, धुणी-भांडी करणे हे काम करत राहायचं माझ्या आयुष्यात मला माहेर सुख मिळाले नाही, उलट मी रक्षण करत होते, माझ्या भावाचे, माझ्या माहेरचे, भाऊ हा सख्खा व चुलत असो त्याची नियत फिरली व फक्त तिचा जितका पैसा घेता येईल तोही घेतला व शेती पण आज माझ्यासारखी अशी वेळ आली, ना पैसा आहे ना पोटापुरते बापाची जमीन, पती गेल्यापासून सर्व असून काबाडकष्ट करून जीवन जगते, भावाच्या घरात कितीही असले तरी आपण किलो ने आणून खायचं ही आजच्या बहिणीची स्थिती आहे. आणि बदल्यात भावाने रक्षण करण्याऐवजी पदरात राख मिळाली. एकल महिला संघटना मराठवाड्यात काम करत असताना किती तरी महिलांनी संघटना ही माझे *माहेर* आणि असे शब्द वापरले आहे. आज महिलांनी समाजात स्वतः च्या कर्तृत्ववर मान मिळवला आहे. ती रणरागिणी बनली आहे. ती सर्व क्षेत्रात कार्यरत आहे. आमच्या महिलांना मीटिंग व शिबिरातून प्रेम भाव मिळतो, तो समाधानाचा असतो. महिला आतुर होत असतात. की परत कधी असा कार्यक्रम आपण लावतो आम्ही अडचणीत एकमेकींना फोन करतो, सुख दुःख वाटून घेतो, जी गोष्ट आपण शेअर करू शकत नाही. ती गोष्ट आम्ही विश्वासाने एकमेकांना सांगतो, व सहकार्य करतो कोरोना काळात माहेरच्या व सासरच्यांनी कोणीही एकल महिलांना मदत केली नाही किंवा साधा फोन नाही परंतु संघटना तून जी मदत मिळाली, ती म्हणजे धान्य रूपात व पैशाच्या स्वरूपात दोन्ही आज महिला अभिमानानं सांगतात. एकल महिला संघटनांनी मला सहकार्य केले.