
केज दि.२२ – मागच्या चार दिवसांपूर्वीच तालुक्यातील मोटेगाव येथे एका35 वर्षीय युवकाने गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसांतच एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील बनकारंजा येथे रविवारी उघडकीस आली. संतोष छत्रभुज थोरात असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
बनकारंजा येथील संतोष छत्रभुज थोरात ( वय २८ ) याने रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या पूर्वी घरी कोणी नसताना घराच्या स्लॅबच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे, पोलीस नाईक महादेव चाटे, पोलीस नाईक संपत शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. या घटनेची युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.