राजकीय
मंत्री नारायण राणे अखेर पोलिसांच्या ताब्यात, प्रकृती बिघडली……!
रत्नागिरी दि.24 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना ताब्यात घेतले. त्याआधी नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळल्याने कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्यात राणे तसेच भाजपविरोधात शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्त आक्रमक झाले आहे. या वक्तव्यामुळे राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांच्या प्रकृतीबाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे.राणे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत आहे. राणे लवकरच रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. तशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिलीय.