ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी……!
नवी दिल्ली दि.२५ – शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.मोदी मंत्रिमंडळ आणि सीसीईएच्या बैठकीत उसाची एफआरपी (रास्त आणि मोबदला देणारी किंमत) सुमारे 5 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावाला अखेर कॅबिनेटनं मंजुरी दिलीय. एफआरपी वाढल्याने साखरेचा एमएसपी आणि इथेनॉलची किंमत वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याचा साखर कारखान्यांना फायदा होणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10% वसुलीच्या आधारावर उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिलीय. एफआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढलीय. गेल्या वर्षी एफआरपीमध्ये 10 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता उसाची एफआरपी 290 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. पीयूष गोयल म्हणाले की, साखरेची एफआरपी 290 प्रति क्विंटल आहे, जी 10 टक्के वसुलीवर आधारित असेल. 70 लाख टन साखरेची निर्यात होणार आहे. त्यापैकी 55 लाख टन झालीय. सध्या 7.5 टक्के ते 8 टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात आहे. पुढील काही वर्षांत हे मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत होणार आहे. आजच्या निर्णयानंतर भारत हा एकमेव देश असेल, जिथे ऊस उत्पादकांना साखरेच्या किमतीच्या सुमारे 90-91% ऊस मिळणार आहे. जगातील देशांमध्ये ऊस उत्पादकांना साखरेच्या किमतीच्या 70 ते 75% ऊस मिळतो. सरकारच्या धोरणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. उसाची एफआरपी किंमत 290 रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना खर्चाचा 87% परतावा मिळेल. इथेनॉल उत्पादन, साखर निर्यातीला प्रोत्साहन, साखर उद्योगाला बफर स्टॉकद्वारे पैसे देणे, अशा निर्णयांनी ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळून त्यांना मोठा फायदा होणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रकमेची वाट पाहावी लागणार नाही
पीयूष गोयल म्हणाले की, वर्ष 2020-21 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 91,000 कोटी द्यायचे होते, त्यापैकी 86,000 कोटी दिले गेलेत. केंद्र सरकारच्या योजनांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या रकमेची वाट पाहावी लागत नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे हित जोपासलेय, जेणेकरून शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर दिले जातील आणि ग्राहकाला महाग साखर खरेदी करावी लागणार नाही.
दरम्यान, एफआरपी हा रास्त आणि किफायतशीर दर आहे, ज्यावर साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करावा लागतो. कमिशन ऑफ एग्रीकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेज (CACP) दरवर्षी एफआरपीची शिफारस करतो. सीएसीपी उसासह प्रमुख कृषी उत्पादनांच्या किमतींबाबत सरकारला शिफारशी पाठवते. त्यावर विचार केल्यानंतर सरकार त्याची अंमलबजावणी करते. सरकार ऊस (नियंत्रण) आदेश, 1966 अंतर्गत एफआरपी निश्चित केली जाते.