
केज दि.२६ – घर व जमिनी पती – पत्नीच्या नावे करण्यात याव्यात, महिलांचे कारण नसताना गर्भाशय काढण्यावर निर्बंध घालून तात्काळ कायदा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महिला अधिकार मंच व मराठवाडा लोक विकास मंचच्या वतीने गुरुवारी केज येथील तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.
महिला अधिकार मंच व मराठवाडा लोक विकास मंचच्या वतीने मंचच्या अध्यक्षा मनीषा घुले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी १ वाजता केज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून धडक मोर्चाला सुरूवात झाली. महिलांनी घोषणाबाजी करून शहर दणाणून सोडले. मोर्चा मंगळवार पेठ, मुख्य रस्त्यावरून थेट तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी महिलांनी विनाकारण गर्भाशय काढण्यावर कायदा करण्यात यावा, गर्भाशय काढलेल्या महिलांना पेन्शन लागू करण्यात यावी, वंचित लाभार्थ्यांना रेशन कार्डचे तात्काळ वाटप करण्यात यावे, निराधारांना तात्काळ विनाअट ३ हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी, वाढत्या महागाईवर आळा घालण्यात यावा, मजुराच्या हाताला काम देण्यात यावे, महिलांवरील वाढते अत्याचार त्वरित थांबवून महिला कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, विधवा, परित्याक्ता व घटस्फोटीत महिलांच्या मुलांना संपुर्ण शिक्षण देण्यात यावे, ऊसतोड कामगारांच्या मुलांचे स्थलांतर थांबवून गावातच मुलांच्या संख्येची अट न ठेवता वसतिगृह सुरू करण्यात यावे या मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी स्वीकारले.

मोर्चात रजनी काकडे, लक्ष्मी बोरा, कौशल्या थोरात, ज्योती साखरे, दिपाली गळंगे, शितल लांडगे, सुप्रिया गित्ते, प्रतिभा देशमुख, सुनिता बिरलिंगे, प्रिया चाळक, शिल्पा सोनवणे, गौरी शिंदे, महादेव जोगदंड यांच्यासह तालुक्यातील शेकडो महिला सहभागी झाल्या.