#Job
आरोग्य विभागाच्या भरती मध्ये कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरक्षण द्या – सारिका उडान – खडके…..!
वडवणी दि.२८ – आरोग्य विभागाच्या वतीने ग्रूप सी व ग्रूप डी ची भरती होणार असून यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आरोग्य विभागाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आगामी काळात भरती मध्ये कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रथम विचार करू असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी अनेक वेळा दिले होते. मात्र या भरती मध्ये कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कसलाही विचार केला गेला नसून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोविड कर्मचाऱ्यांच्या नशिबी निराशा आली असून शासनाच्या व आरोग्य विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली असून आरोग्य विभागाच्या भरती मध्ये कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरक्षण द्या. अशी मागणी परिचारिका सारिका उडान – खडके यांनी प्रसिद्धीपत्रकद्वारे केली आहे.
गेल्या वर्षी कारोना काळात आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असताना शासनाने कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागात भरती केली. यावेळी हजारो सर्वसामान्य कुटुंबातील मुला – मुलींनी आपल्या व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता कोविड मध्ये काम करत असलेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. महामारी मध्ये गरज असताना देशसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. त्यांनी रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून रुग्णांना मानसिक आधार दिला व त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. हे काम करत असताना हजारोच्या संख्येने कर्मचारी देखील कोरोना रुग्ण झाले. मात्र तरीसुद्धा पुन्हा बरे झाल्यानंतर नव्याने काम केले. यादरम्यान कोरोना मध्ये काम करत असल्यामुळे बऱ्याच जणांनी त्यांना जवळ सुद्धा येऊ दिले नाही, अत्यंत विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहिले जात असे. अश्या विविध मानसिक अवहेलना सहन करून देखील ते आपलं कर्तव्य बजावताना कधीही कुठेही कसलीही कसूर ठेवली नाही. आज त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी ची वेळ आली असून बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यांचा विचार करावा व सध्या काढण्यात आलेल्या भरती मध्ये आरक्षण देऊन प्रथम विचार करावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.