
माजलगाव दि.२ – घरगुती भांडणाच्या वादातून मुलाने आईच्या मानेवर विळ्याने वार करून स्वतः फाशी घेतल्याच्या घटनेला वेगळे वळण आले आहे. मोठ्या भावाने दारुच्या नशेत आईवर वार केल्याचे लक्षात येताच लहान भावानेच मोठ्या भावाचा गळा आवळून खून केला आणि व त्यास आत्महत्येचे स्वरुप देण्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासामध्ये उघड झाल्यानंतर पोलिसांनी लहान भावाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालीपारगाव येथील पारूबाई मच्छिंद्र कदम ( वय -50) यांची त्यांचा मोठा मुलगा बापू मच्छिंद्र कदम (वय 30) याच्यासोबत घरगुती कारणावरून वाद होत होते. मंगळवारीही त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात बापूने आईच्या मानेवर विळ्याने वार केला. यात पारुबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना माजलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून बीड ला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बापू याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. मात्र यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे यांनी मयत बापू याचा भाऊ गणेश यास ताब्यात घेतले व सखोल चौकशी केली. दारुच्या नशेत आपणच भावाचा गळा आवळून खून केला व नंतर आत्महत्येचा बनाव केला अशी कबुली गणेश याने दिली. या प्रकरणी वडिलांनी फिर्याद दाखल केल्याने गणेश याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे.