
केज दि.3 – बेरोजगारीमळे आलेल्या आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील आनंदगाव (सा) येथील 24 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना घडली असून युसुफ वडगाव पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील आनंदगाव (सा) येथील प्रशांत आबासाहेब गायकवाड (24) युवकाला शिक्षण होऊनही रोजगार मिळालेला नव्हता. त्यामुळे तो सतत आर्थिक विवंचनेत असे. त्यातच त्याने दि.2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
सदरील घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार पी.के.शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व केज उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टेम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दि.3 रोजी सकाळी प्रशांतवर आनंदगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.