केज तालुक्यातील चिंचोली ( माळी ) येथील शेतकरी चंद्रकांत सखाराम राऊत हे पोळा सणाच्या खरेदीसाठी शुक्रवारी केज शहरात आले होते. आठवडी बाजारात खरेदी करून झाल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास कानडी चौकातील एका दुकानातून त्यांनी नारळ खरेदी केले. त्यांनी पॅन्टच्या पाठीमागील खिशात ठेवलेले १८ हजार रुपये काढून त्यातील १०० रुपये दुकानदारास देऊन उर्वरित १७ हजार ९०० रुपये परत पॅन्टच्या पाठीमागील खिशात ठेवले. मात्र पाळत ठेवून पाठीमागे असलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील १७ हजार ९०० रुपये घेऊन पोबारा केला. चंद्रकांत राऊत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.