जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत निवडणुका नको……!
मुंबई दि.४ – गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. याच ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा झाली. त्यात सर्वपक्षांचं एकमत झाल्याचं पहायला मिळतंय.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून राज्य सरकारने दुसऱ्यांदा सर्वपक्षीय बैठक घेतली. सर्व पक्षांनी एकत्र येत यावर मार्ग काढावा यासाठी या बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी इम्पेरिकल डाटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीयांचे एकमत झालं असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.भारत सरकारकडे इम्पेरिकल डाटा तयार आहे. तो जर राज्याला दिला तर आरक्षणाचा प्रश्न मिटेल. फक्त महाराष्ट्रच नाही तर सर्व राज्यांचा इम्पेरिकल डाटावर अधिकार आहे. आरक्षणप्रश्नी आयोजित केलेल्या या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांचे एकमत झाले. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये या मुद्द्याला सुद्धा सर्वांनी पाठिंबा दिला असल्याचं देखील छगन भुजबळांनी सांगितलं आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली. तर भाजप आणि राष्ट्रवादीने देखील ओबीसी आरक्षणाच्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाल्याचं दिसून येतंय.