केज दि.५ – उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात मागच्या 24 तासांत दमदार पावसाने हजेरी लावल्याने केज, कळंब, लातूर, धारूर आणि इतर कित्येक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
केज तालुक्यात असणारे मांजरा धारण बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्याची तहान भागवणारे धरण आहे. प्रचंड मोठी पाणी क्षमता असल्याने हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती आलेली आहे. परंतु सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर कांही दिवस पावसाने ओढ दिल्याने धरणात गरजेपुरते तरी पाणी साठा होईल की नाही अशी शंका होती. मात्र मागच्या चोवीस तासांत कळंब, परांडा, वाशी इत्यादी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने व छोट्या छोट्या नद्या भरून वाहू लागल्याने मांजरा नदीला पूर आला असून कळंब जवळ असलेल्या जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले असून पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली असून 50 टक्क्यांच्यावर पाणी पातळी गेली आहे.