शेती
डी डी बनसोडे
September 5, 2021
मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, तर जोरदार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान……!

केज दि.५ – तालुक्यातील जाधवजवळा येथील तलाव ओव्हरफ्लो झाला असून पाणी प्रश्न जरी मिटला असला तरी नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
जाधवजवळा येथील मध्यम प्रकल्प भरून वाहू लागला आहे या परिसरातील जाधव जवळा कोरेगाव सावंतवाडी कोठी, लहुरी, येवता सह अनेक गावात काल शनिवार रोजी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अनेक गावांच्या नदी, ओढे भरून वाहू लागली आहेत. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जाधव जवळा येथील मध्यम प्रकल्प तुडुंब भरला आहे.या प्रकल्पातुन जाधवजवळा, डोणगाव, शिरपूरा, उमरी कोरेगाव, टाकळी इत्यादी गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या गावांचा पुढील वर्षाचा पाणी प्रश्न मिटला असून या भागातील शेतीच्या पाणी वापराचा ही प्रश्न मिटला असल्याने शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे.
परंतु कालच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भागातील ऊस ऊस, सोयाबीन जमीनदोस्त झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे व संततधार पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
